आज जगभरात / दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन (Mothers Day) साजरा केला जातो. या दिवशी आईच्या मातृत्वाचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तिचे आभार मानायची पद्धत आहे. मातृदिन म्हणजे काय ?
मातृ: देवो भव:
जगभरात आई आणि मातृत्वाचा सन्मान करण्याची परंपरा हि जुनी आहे. आपण नवरात्रीत घट बसवतो, देवीच्या वेगवेळ्या रूपांची पूजा करतो, हे मातृपूजनच आहे. भारतवर्षात प्रत्येक देवीला आई / माँ म्हणूनच आळवलं जातं. इतकंच काय, प्रसंगी आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. स्वतःच्या बाळासाठी रात्रीच्या अंधारात अवघड कडा उतरून जाणाऱ्या हिरकणी आणि स्वतःच्या दत्तकपुत्रासाठी, स्वराज्यासाठी लढणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, प्रसंगी मऊ प्रसंगी कणखर असणारी हि सगळी आईची रूपं आहेत
मराठीत तरी विसाव्या शतकात जितक्या कविता लिहिल्या गेल्या त्यातल्या बऱ्याच फक्त आई वर असतील. ‘श्यामची आई’ हे तर आपल्या आणि येणाऱ्या पिढयांसाठी मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र आहे.
आई आणि मातृत्वाचा सन्मान करण्याची परंपरा प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांपर्यंत मागे जाते. ते देवी रिआ (Rhea) आणि सायबील (Cybele) यांच्या सन्मानार्थ उत्सव साजरे करत होते. पण सध्याच्या स्वरूपातील मातृदिनाचा सर्वात स्पष्ट संदर्भ म्हणजे “मदरिंग संडे” (Mothering Sunday) हा सुरुवातीला ख्रिश्चन उत्सव होता.

एके काळी, युनायटेड किंगडम (United Kingdom) आणि युरोपच्या काही भागात ही एक प्रमुख परंपरा होती. ही ख्रिश्चन धर्मपंथातील उपवासांच्या चाळीस आठवड्यांमधील (Lent) चौथ्या रविवारी साजरी केली जायची. या दिवशी लोक त्यांच्या “मदर चर्च” (Mother Church) म्हणजे घराच्या जवळच्या मुख्य चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्यासाठी जात होते.
काळानुसार, मदरिंग संडे ही परंपरा अधिक धर्मनिरपेक्ष उत्सवात रूपांतरित झाली.
हे माहित होता का? जगभरात मातृदिनी वर्षातील इतर कोणत्याही दिवसांपेक्षा जास्त फोन कॉल्स केले जातात. या सुट्टीच्या दिवशी आईशी बोलणे वाढल्यामुळे फोन वाहतुकीत ३७ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
अमेरिकेतील मातृदिनाचा उगम :
अमेरिकेत साजरा केला जाणारा मातृदिनाचा उगम १९ व्या शतकात आढळतो. गृहयुद्धापूर्वीच्या काळात, पश्चिम व्हर्जिनियाच्या ॲन मारिया रीव्ह्स जार्व्हिस (Ann Maria Reeves Jarvis) यांनी स्थानिक महिलांना त्यांच्या मुलांची काळजी कशी घ्यावी हे शिकवण्यासाठी “मदर्स डे वर्क क्लब्स” (Mothers’ Day Work Clubs) सुरू करण्यास मदत केली.

हे क्लब पुढे गृहयुद्धामुळे विभाजित झालेल्या देशाच्या या भागात एकत्रीकरणाचे बळ बनले. १८६८ मध्ये जार्व्हिस यांनी “मदर्स फ्रेंडशिप डे” (Mothers’ Friendship Day) आयोजित केला. या दिवशी मातांनी माजी युनियन आणि कॉन्फेडरेट सैनिकांसोबत एकत्र येऊन समेट करण्यासाठी प्रयत्न केले.
मातृदिनासाठीच्या इतर प्रेरणा :
हक्क आणि गुलामगिरीविरोधी चळवळी करणाऱ्या जूलिया वॉर्ड होवे (Julia Ward Howe) यांचा मातृदिनाशी संबंध आहे. १८७० मध्ये होवे यांनी “मदर्स डे प्रोक्लॅमेशन” (Mother’s Day Proclamation) लिहिले. हा जाहीरनामा जगातील शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी मातांना एकत्र येण्याचे आवाहन करणारा होता. दरवर्षी जून २ रोजी “मदर्स पीस डे” (Mother’s Peace Day) साजरा करण्याची त्यांनी मोहीम चालवली.
मातृदिनाच्या अग्रणी महिलांमध्ये ज्युलिएट कॅल्हून ब्लेकली (Juliet Calhoun Blakely) यांचा समावेश होता. ब्लेकली या एक मद्यनिषेध / दारूबंदी कार्यकर्त्या होत्या ज्यांनी १८७० च्या दशकात मिशिगनमधील अल्बियन(Albion)मध्ये स्थानिक मातृदिनासाठी प्रेरणा दिली.


मेरी टॉव्लेस सॅसिन (Mary Towles Sasseen) आणि फ्रँक हेरिंग (Frank Hering) या जोडीने १९ व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला मातृदिनाचे आयोजन करण्यासाठी काम केले. काही लोकांनी हेरिंगला “मातृदिनाचे जनक” (the father of Mothers’ Day) असेही म्हटले आहे.
अमेरिकेत हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस कसा बनला :
ॲना जार्व्हिस (Anna Jarvis), ॲन मारिया रीव्ह्स जार्व्हिस यांची मुलगी, यांनी मातृदिनाची कल्पना आईच्या त्यागाचा सन्मान करण्याचा एक मार्ग म्हणून केली.
मातृदिनाला राष्ट्रीय सुट्टी बनवण्यासाठी जार्व्हिसने अनेक वर्षे संघर्ष केला. १९०८ मध्ये, तिने पश्चिम व्हर्जिनियामधील ग्राफ्टनमधील एका मेथोडिस्ट चर्चमध्ये पहिला अधिकृत मातृदिनाचा उत्सव आयोजित केला. त्याच दिवशी, फिलाडेल्फियातील व्हॅनामेकरच्या (Wanamaker’s) एका दुकानात हजारो लोकांनी मातृदिनाचा कार्यक्रम आयोजित केला.

पहिल्या मातृदिनानंतर, जार्व्हिसने आपले आयुष्य या सुट्टीला राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये जोडण्यासाठी समर्पित केले. तिने असा युक्तिवाद केला की अमेरिकन सुट्ट्या पुरुषांच्या यशाकडे अधिक कलतात. तिने आईसाठी एक खास दिवस सुरु करण्याची मोहीम सुरू केली.
१९१२ पर्यंत, अनेक राज्यांनी, शहरांनी आणि चर्चनी मातृदिनाला वार्षिक सुट्टी म्हणून स्वीकारले होते आणि जार्व्हिसने ‘मातृदिन आंतरराष्ट्रीय संघटना’ (Mother’s Day International Association)ची स्थापना केली होती.
तिच्या प्रयत्नांचे फळ १९१४ मध्ये दिसून आले जेव्हा राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस अधिकृतपणे मातृदिन म्हणून घोषित करणारा कायदा पारित केला.
ॲना जार्व्हिस यांनी मातृदिनाच्या व्यापारीकरणाचा निषेध केला
ॲना जार्व्हिसने मातृदिन हा दिवस आई आणि कुटुंबातील लोकांमधला वैयक्तिक उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा म्हणून सुरुवात केली होती. पण मातृदिन राष्ट्रीय सुट्टी बनली तसे फुलांचे दुकानदार, कार्ड कंपन्या आणि इतर व्यापारी या दिवसाच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ लागले.
सुरुवातीच्या काळात जार्व्हिस यांनी मातृदिनाच्या प्रसिद्धीसाठी फुलांच्या उद्योगासोबत काम केले होते, परंतु १९२० पर्यंत मातृदिनाचे व्यापारीकरण झाल्याने त्या खूप नाराज झाल्या. त्यांनी या बदलाचा निषेध केला आणि लोकांना मातृदिनाच्या दिवशी फुले, कार्ड्स आणि चॉकलेट्स खरेदी करणे बंद करण्याचे आवाहन केले.
शेवटी, जार्व्हिसने मिठाई उत्पादक, फुलांचे दुकानदार आणि अगदी धर्मादाय संस्थांविरुद्धही मोहिम चालवली ज्यांनी मातृदिन (Mother’s Day) हे नाव वापरले होते. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचा मोठा भाग कायदेशीर लढ्यासाठी खर्च केला. १९४८ मध्ये त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी या सुट्टीचा पूर्णपणे तिरस्कार केला होता आणि अमेरिकन कॅलेंडरमधून सुट्टी हटवण्यासाठी सरकारकडे सक्रियपणे लॉबिंगही केले होते.
जगभरातल्या मातृदिनाच्या परंपरा :
जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात मातृदिन साजरा केला जातो.
थायलंडमध्ये, सध्याच्या राणी सिरीकिट यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्टमध्ये नेहमीच मातृदिन साजरा केला जातो.
इथियोपियामध्ये आढळणाऱ्या मातृदिनाच्या आणखी एका पर्यायी स्वरूपात, अनेक दिवसांचा मातृत्वाचा सन्मान करणारा उत्सव असलेल्या “अँट्रोष्ट” (Antrosht) च्या निमित्ताने शरद ऋतूमध्ये कुटुंब जमून गाणी गातात आणि मोठी मेजवानी करतात.
अमेरिकेत, आई आणि इतर महिलांना भेटवस्तू आणि फुले देऊन मातृदिन साजरा केला जातो. मुले आईला स्वयंपाक किंवा इतर घरातील कामांपासून सुट्टी देऊनही हा दिवस साजरा करतात.
कधीकधी, मातृदिन हा राजकीय किंवा स्त्रीवादी चळवळी सुरू करण्याची तारीख म्हणूनही वापरला जातो. १९६८ मध्ये मार्टिन ल्युथर किंग जुनियर यांच्या पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांनी वंचित महिला आणि मुलांना पाठिंबा देण्यासाठी मातृदिनाचा वापर करून एक मोर्चा आयोजित केला. १९७० च्या दशकात महिला गटांनी समान हक्क आणि बालसंगोपन सुविधांची गरज अधोरेखित करण्यासाठी या सुट्टीचा वापर केला.
तर जगभरातील तमाम मायमाऊलींना आणि मातृतुल्य महिलांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
संदर्भ :
1) history.com
Leave a Reply